फोनवर म्हटले साल्या, गैरसमज झाला महिलेचा — जबर हाणामारीत मृत्यू झाला मोबाईलधारकाचा

जळगाव : मोबाईलवर संबंधीताशी बोलतांना गमतीने त्याला “साल्या साल्या” असे म्हणत असतांना महिलेचा गैरसमज झाला. साल्या हा शब्द आपल्या पतीला उद्देशून म्हणत आहे असे महिलेला वाटले. या गैरसमजातून झालेल्या मारहाणीत चौघे जखमी तर मोबाईलवर बोलणारा मरण पावला आहे. केवळ गैरसमजातून झालेल्या या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील रिधुरी या गावी घडली आहे. या घटनेप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिन जणांसह तिन महिला अशा एकुण सहा जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनराज वासुदेव सोनवणे असे या मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. यावल तालुक्यातील रिधुरी येथे गोठ्याशेजारील रस्त्यावरुन भाऊबंदकीत वाद होता. दरम्यान मकर संक्रातीच्या सायंकाळी धनराज सोनवणे हे मोबाइलवर जेसीबी मशीनचालकासोबत बोलतांना त्याला गमतीने साल्या साल्या असे म्हणत होते. शेजारी राहणाऱ्या भाऊबंदकीतील महिलेस हे संभाषण आपल्या पतीविषयी असल्याचा संशय आला. तिने याबाबत पतीला माहिती दिली.

त्या महिलेच्या पतीने लोखंडी पाइप धनराज सोनवणे यांच्या डोक्यात मारुन त्यांना ठार केले. धनराज सोनवणे यांची मुले व नातेवाईक यांनाही इतरांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत चौघे जण जखमी झाले असून एकजण दवाखान्यात वैद्यकीय उपचार घेत आहे. तिघा पुरुषांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here