स्वत:च्याच घरावर गोळीबारीचा अफलातून प्रकार

जळगाव : आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करणा-यास गोळीबाराच्या बनावट गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वत:च्याच घरावर गोळीबार करणा-याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाअंती हा प्रकार उघडकीस आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील डोणदिगर शिवारात हा प्रकार घडला. याप्रकरणी एका जणास अटक करण्यात आली आहे.  

चाळीसगाव तालुक्यातील एका मुलीच्या अपहरण प्रकरणात कैलास रघुनाथ पाटील (रा. डोणदिगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी या घटनेची फिर्याद दिली होती. मुलीच्या वडिलांना गोळीबाराच्या खोट्या गुन्ह्यात फसवण्यासाठी कैलास याने मध्य प्रदेशातील उमर्टी येथून एक गावठी बनावटीचा कट्टा विस हजार रुपयांत खरेदी केला.

कैलासने त्याचा मेहुणा गणेश पाटील याच्याकडून चाळीसगाव तालुक्यातील डोणदिगर या गावी स्वतःच्या घरावर 13 फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा ते तीन वाजेच्या कालावधीत गावठी कट्ट्याने गोळीबार करवून घेतला. करवून घेतलेला गोळीबार मुलीच्या वडिलांनी केल्याची खोटी माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांपैकी एकास ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. त्याच्या जबाबात पोलिसांना विसंगती आढळली. हा घडवून आणलेला बनावट गोळीबार असल्याचे निष्पन्न झाले.

मुलीच्या वडिलांनी कैलास पाटील विरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी कैलास पाटील व त्याचा मेहुणा गणेश पाटील यांचा या घडवलेल्या गोळीबार घटनेत सहभाग असल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी खोटी फिर्याद देऊन फसवणूक करण्यासह बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी कैलास रघुनाथ पाटील व गणेश उत्तम पाटील या शालक मेहुण्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास पाटील यास पोलिसांनी अटक केली असून गणेश पाटील हा फरार झाला आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here