बंदीवानाच्या हत्येप्रकरणी तुरुंग अधिका-यास अटक

जळगाव : कारागृहातील बंदीवानाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी दाखल खूनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी असलेल्या तुरुंग अधिका-यास अटक करण्यात आली आहे. जितेंद्र शेनफडू माळी (रा. शेलवड ता. बोदवड) असे अटक करण्यात आलेल्या तुरुंग अधिका-याचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून जितेंद्र माळी फरार होता.

10 व 11 सप्टेबर 2020 दरम्यान चिन्या उर्फ रविंद्र रमेश जगताप हा न्यायालयीन बंदी जळगाव उप कारागृहात दाखल होता. वैद्यकीय उपचारार्थ रुग्णालयात दाखल असतांना त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी सुरुवातीला नशिराबाद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. अकस्मात मृत्यूच्या तपासादरम्यान तत्कालीन सब जेल अधिक्षक पेटरस गायकवाड, तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी, अण्णा काकड (रा. पानेवाडी ता. नांदगाव – नाशिक), अरविंद प्रकाश पाटील (रा. हिरापूर रोड आदर्श नगर  चाळीसगाव) आणि दत्ता हनुमंत खोत (रा. गोसावीवाडी पो. अंबी ता. परंडा जि. उस्मानाबाद) अशा पाच जणांनी त्याला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले होते. या मारहाणीमुळे गुन्हेगार चिन्या याचा मृत्यू ओढवला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील अण्णा काकड, अरविंद पाटील व दत्ता खोत  यांना यापुर्वीच अटक  करण्यात आली आहे. जितेंद्र शेनफडू माळी या तुरुंग अधिका-यास अटक करण्यात आली असून तत्कालीन सब जेल अधिक्षक पेटरस गायकवाड फरार आहे. त्याची माहिती देणा-यास योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे. या गुन्ह्यातील फरार तुरुंग अधिकारी जिंतेद्र माळी हा जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात येणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. डॉ. विशाल जायस्वाल यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला सुचना दिल्या. गुन्हे शोध पथक प्रमुख पोहेकॉ. सलीम तडवी यांच्यासह पोकॉ. मिलींद सोनवणे, विनोद पाटील, समाधान पाटील, विकास पहुरकर आदींच्या पथकाने जितेंद्र माळी यास आकाशवाणी चौकातून अटक केली. पुढील तपास पो.नि. डॉ. विशाल जायसवाल व त्यांचे सहकारी पथक  करत  आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here