मंदीरात किर्तन, गावात मुलीवर अत्याचार! — पोलिस तपासात उघड झाले नराधम चार!!

On: September 24, 2026 9:41 AM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : गावात त्या रात्री भक्तिमय वातावरण होते. मंदिरात किर्तन सुरू होते. घराघरांतून लोक किर्तन ऐकण्यासाठी बाहेर पडले होते. एका अल्पवयीन मुलीचे आई-वडील देखील त्या रात्री किर्तनाला गेले होते. त्यांना कल्पनाही नव्हती की, ते घराबाहेर असताना त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या आयुष्यात घडलेली एक घटना पुढे संपूर्ण गावाला हादरवून सोडणार आहे. रात्री सुमारे अकराच्या सुमारास कीर्तन संपले. त्या मुलीचे आई-वडील घरी परतले. घरात सर्व काही नेहमीसारखे दिसत होते. मात्र काही वेळातच त्यांच्यापर्यंत एक धक्कादायक माहिती पोहोचली…

गावातील गुरे बांधण्याच्या जागी एका प्रौढ व्यक्तीने त्यांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे काही मुलींनी पाहिले होते. रात्र बरीच झाली होती. मुलगी झोपली होती. आई-वडिलांनी त्या क्षणी तिला उठवले नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी तिच्याशी शांतपणे संवाद साधला, तेव्हा समोर आलेली माहिती एका रात्रीपुरती मर्यादित नव्हती.

या गुन्ह्याचा पहिला धागा…..सहा महिन्यांपूर्वीचा प्रकार आणि क्रमाक्रमाने इतर लैंगिक अत्याचाराचे प्रकार उघडकीस येण्यास सुरुवात झाली. कुटुंबीयांनी सखोल विचारपुस केल्यानंतर त्या मुलीने एका ओळखीच्या अल्पवयीन मुलाबाबत सांगितले. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्या मुलाने तिच्या घराजवळील एका सार्वजनीक जागेचा आडोसा घेत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले.

कुटुंबीयांसाठी हा पहिलाच धक्का होता. मात्र तिच्या कथनातून या गुन्ह्याचे आणखी धागे मिळत गेले. एकामागून एक नावे समोर येऊ लागली. हळूहळू समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे पाच महिन्यांपूर्वी गावातील नारायण चौधरी यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी मधुकर भारंबे याने खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत तिला आपल्या घरी बोलावल्याचा आणि तेथे अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला.

Amitkumar Bagul (Investigation Officer and Incharge)

यानंतर सात-आठ दिवसांपूर्वी विनायक पाटील याने तिला गुरे बांधण्याच्या ठिकाणी बोलावून अत्याचार केल्याचे तिच्या कथनातून समोर आले. पण या सगळ्यात सर्वात अलीकडची घटना अशी होती, जिच्यामुळे हे प्रकरण अखेर उघडकीस आले. काही दिवसांपूर्वी मनोहर पाटील यानेही त्याच ठिकाणी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार काही गावकऱ्यांच्या निदर्शनास आला.

घटना पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या काही लोकांनी मनोहर पाटील याला मारहाण करून तेथून हाकलून दिले. मुलीला तिच्या घरी पाठवण्यात आले. पण त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना जेव्हा मागील घटनांची माहिती मिळाली, तेव्हा प्रश्न केवळ एका संशयीत नराधम आरोपीपुरता राहिला नाही.

बुद्धीने चंचल नसलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या शांततेचा गैरफायदा घेऊन वेगवेगळ्या व्यक्तींनी तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला. तक्रारीनुसार, या घटनांनंतर संशयीत नराधम आरोपींकडून तिला खाण्यासाठी पैसे देण्यात येत होते. संपूर्ण प्रकार समजल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी विलंब न करता वरणगाव पोलिस ठाणे गाठले. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल यांची भेट घेऊन मुलीने सांगितलेला संपूर्ण घटनाक्रम त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

Sukram Savkare – police constable

पोलिसांसमोर आता एक गंभीर आव्हान होते—एका घटनेचा तपास करायचा की, या मुलीच्या कथनातून समोर आलेल्या प्रत्येक घटनेची स्वतंत्रपणे पडताळणी करायची? सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने हे प्रकरण गांभीर्याने घेत तपासाची दिशा निश्चित केली. तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला वेग देखील देण्यात आला.

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर विश्वनाथ भारंबे, विनायक वसंत पाटील, मनोहर रामा पाटील, नारायण सोमा चौधरी आणि एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र. नं. 216/2026 भारतीय न्याय संहितेतील कलम 65(1), 351(2) तसेच बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तपासाची सुत्रे सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे सरकू लागली. या तपासात पोलीस कॉन्स्टेबल सुकराम सावकारे यांचे त्यांना सहकार्य लाभण्यास सुरुवात झाली.

क्रमाक्रमाने चौघा नराधम संशयीतांना अटक करण्यात आली. अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतल्यानंतर त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे.

पण या प्रकरणाचा सर्वात मोठा प्रश्न…ही केवळ एका गावातील घटना म्हणून विसरून जाण्याची बाब नाही. कारण या प्रकरणाने एक अत्यंत गंभीर प्रश्न समाजासमोर उभा केला आहे—अल्पवयीन संथ बुद्धीच्या मुलींच्या शांततेला त्यांची संमती समजले जाते का? अर्थातच नाही. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार हा गंभीर गुन्हा आहे. मुलाला किंवा मुलीला आमिष दाखवणे, दबाव आणणे, फसवणे किंवा त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेणे हे कोणत्याही परिस्थितीत निश्चीतच स्विकारार्ह नाही.

मुलांच्या वर्तनात अचानक बदल जाणवला, ते एखाद्या व्यक्तीला घाबरत असतील, एकटे पडत असतील किंवा काही सांगण्यास टाळाटाळ करत असतील तर त्यांना दोष देण्याऐवजी त्यांचे विश्वासाने ऐकणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण देणे गरजेचे आहे. एक अल्पवयीन  मुलगा किंवा मुलगी गप्प आहे म्हणजे सगळे ठीक आहे, असे समजू नका. त्यांच्या शांततेमागे एखादी भीती, दबाव किंवा वेदना लपलेली असू शकते. मुलांचे संरक्षण ही केवळ पोलिसांची किंवा पालकांची जबाबदारी नाही. ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment