पती, पत्नी व प्रेयसीचा झाला त्रिकोणी झोल ! संगिताने आत्महत्या करुन पुर्ण केला गोल !!

दुर्दवी संगिता शिरसाठ

संशयित पोलिस उपनिरिक्षक धनराज शिरसाठ

जळगाव :
जळगाव शहराच्या जुना मेहरुण रोड भागात लॉंड्री व्यवसाय करणारे दगडू सपके हे मनमिळावू  स्वभावाचे म्हणून समाजात परिचित आहेत. त्यांची मुलगी संगिता विवाहयोग्य झाली होती. त्यामुळे साहजिकच तिच्या लग्नाची चिंता तिचे वडील दगडू सपके यांना लागली होती.
संगितासाठी वर संशोधनाचे काम दगडू सपके यांनी शिघ्रगतीने सुरु केले होते. त्यात लवकरच त्यांना यश देखील आले. जळगाव शहरापासून जवळच असलेल्या धरणगाव तालुक्यातील वराड मुसळी येथील एक स्थळ त्यांना योग्य वाटले. वराड मुसळी येथील बाबुलाल शिरसाठ यांचा मुलगा धनराज शिरसाठ या तरुणाचे ते स्थळ होते. उपवर धनराज शिरसाठ हा पोलिस दलात कर्मचारी म्हणून नोकरीला होता. दगडू सपके यांनी निवडक नातेवाईकांच्या मदतीने मध्यस्तांमार्फत बोलणी करुन बैठक बोलावण्याचे नियोजन केले. दोन्ही बाजूने पसंती झाल्यानंतर लग्नाची बोलणी यशस्वीरित्या पार पडली. जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोठारी मंगल  कार्यालयात संगिता व धनराज यांचा विवाह मोठ्या थाटामाटात सुमारे दहा वर्षापुर्वी पार पडला. लग्नापुर्वीची संगिता सपके लग्नानंतर संगिता शिरसाठ  झाली होती.
लग्नानंतर माप ओलांडून संगिता सासरी वराड मुसळी या गावी  आली. तिचे वैवाहीक जिवन सुखा समाधानाने सुरु झाले. लग्नाचे वेळी पोलिस दलातील धनराजची ड्युटी जळगावचे तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा टेलीफोन ऑपरेटर म्हणून सुरुवातीला मंत्रालयात लागली होती. त्यानंतर लवकरच जळगाव पोलिस मुख्यालयात त्याची बदली झाली. मुख्यालयात काही दिवस नोकरी केल्यानंतर जळगाव शहर पोलिस स्टेशनला धनराजची ड्युटी लागली. दरम्यान सन 2013-14 या कालावधीत खात्यांतर्गत परिक्षा देवून धनराजने पोलिस उप निरिक्षक म्हणून बढती मिळवली. नाशिक ट्रेनिंग अकॅडमी मधे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर गडचिरोली जिल्हयात पोलिस उपनिरिक्षक म्हणून त्याने सेवा बजावण्यास सुरुवात केली.
लग्न झाल्यानंतर संगिता व धनराज यांचे वैवाहिक जिवन सुखाने सुरु झाले. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने संगितासाठी सुखाचे गेले. या कालावधीत दोघांच्या संसारवेलीवर एक पुत्र व एक कन्यारत्न आले. त्यांनी त्यांचे नाव भार्गवी आणि शिव असे ठेवले.
दिवसामागून दिवस जात होते. कॅलेंडरच्या तारखा  बदलत होत्या. काळ पुढे पुढे सरकत होता. गडचिरोली जिल्हयातील मुलचेरा पोलिस स्टेशनला उप निरिक्षक पदावर कार्यरत धनराज शिरसाठ याचे पत्नीसोबत किरकोळ कारणावरुन खटके उडू लागले. संगिताचे सुखाचे दिवस निघून गेले होते. पतीपासून होणारा त्रास संगिता फोनद्वारे आपल्या माहेरी सांगत असे. संसार म्हटला म्हणजे पती पत्नीत वाद हे होतच असतात असे तिचे आईवडील तिला समजावून सांगत असत. आज  नाही तर उद्या सर्व काही सुरळीत होईल असे तिला सांगून आईवडील व भाऊ गणेश तिची समजूत काढत असत. त्यामुळे पतीपासून होणारा त्रास संगिता मुकाट्याने सहन करत होती.
दरम्यानच्या काळात धनराज एका महिला पोलिस कर्मचा-याच्या संपर्कात आला. संपर्कातून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ती महिला कर्मचारी दिसायला देखणी होती. एकाच खात्यात असल्याने दोघे जवळ येण्यास वेळ लागला नाही. दोघांच्या मनाच्या तारा लवकरच जुळून  आल्या. हा प्रकार संगीताच्या कानावर येण्यास वेळ लागला नाही. तिने हा प्रकार तिच्या आईवडिलांना कळवला. आता प्रकरण डोक्याच्या वर जात असल्याचे तिच्या आईवडिलांच्या लक्षात आले. त्यांनी धनराज कार्यरत असलेल्या ड्युटीच्या गावी गडचिरोली जिल्हयातील मुलचेरा येथे जाण्याचे ठरवले.
दरम्यान संगिताचा मुलगा शिव याचा वाढदिवस जवळ आला होता. या  वाढदिवसाच्या निमित्ताने जावई धनराज याची समजूत घालण्याचे सर्वांनी ठरवले होते. तिचे आईवडील व  भाऊ गणेश असे सर्व जण जळगाव येथून गडचिरोली जिल्हयातील मुलचेरा येथे गेले. संगिताचा मुलगा शिव याच्या वाढदिवसाला बरेच नातेवाईक हजर असल्याने जावई धनराज यास समजावून सांगण्यास त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे सर्वजण तसेच जळगावला परत आले.
त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी संगिताने आपल्या माहेरी फोनवर सांगीतले की पती धनराज याचे त्या महिला पोलिस              कर्मचा-यासोबत असलेले प्रेम संबंध वाढलेले आहेत. त्यावरुन आमच्यात वाद वाढलेले आहेत. अशा प्रकारे दोघात तिसरीचा प्रवेश झाल्याने धनराज व संगिता यांच्या संसारात कटूता आली होती. हा वाद शिगेला पोहोचल्याने दोन्ही परिवारातील जेष्ठ सदस्यांनी आपसात बैठक घेण्याचे ठरवले.
मार्च महिन्यात संगिता तिच्या पती व दोन्ही मुलांसमवेत जळगाव येथे आली होती. या बाबत माहीती मिळाल्याने संगिताचे आई वडील व जवळचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी तेथे गेले. त्यावेळी धनंजयची बाजू मांडण्यासाठी त्याचे आईवडील व जवळचे नातेवाईक अगोदरच तेथे हजर होते. त्यावेळी संगिता हिने आपल्या पतीचे कारनामे सर्वांसमक्ष कथन केले.
पती धनराज याचे खात्यातील एका महिला पोलिस कर्मचा-यासोबत प्रेम संबंध असल्याचे सांगत तिने तिच्या व्यथा कथन करण्यास सुरुवात केली. तिने सांगितल्यानुसार एके दिवशी ती घरात झोपली असतांना पती धनराज एकाएकी उठून घराबाहेर गेला. पती अचानक कुठे गेला म्हणून तपास करण्यासाठी तिने पोलिस स्टेशनला फोन लावून विचारणा केली. पती धनराज पोलिस स्टेशनला नव्हता. त्यामुळे तिने घराबाहेर जावून पाहिले असता बाजूच्या घरातून  तिला काहीतरी आवाज येत होता. ती त्या घराच्या दाराजवळ गेली असता धनराज व त्या महिला पोलिस कर्मचा-याचा आवाज तिला आतून ऐकू आला. त्यामुळे संगीता जोरात ओरडली. तिचा आवाज ऐकून परिसरातील लोक जमा झाले. त्यावेळी धनराज त्या घरातून बाहेर आला. संतापाच्या भरात त्याने पत्नी संगीताचे केस पकडून तिला घरात ओढत नेले. आत नेवून त्याने तीला मारहाण केली. त्या महिला कर्मचा-यासोबत आपण लग्न करणार असल्याचे त्याने तिला ठणकावून सांगितले. अशा प्रकारे धनराज याने त्या महिला पोलिस कर्मचा-यासोबत आपले प्रेम संबंध कबुल केले.
परस्त्रीसोबत असलेले आपले संबंध संगिताने सर्वांसमक्ष उघड केल्याने धनराज संतप्त झाला. संतप्त धनराजने त्याच वेळी सर्वांसमक्ष बॅंकेचा एक कोरा चेक आणून सर्वांना दाखवला. या चेकवर तुम्ही हवी तेवढी रक्कम टाका आणी तुमच्या मुलीच्या नावे असलेले घर देखील तुम्हीच ठेवून घ्या असे म्हटले. आता मला संगितापासून सोडचिठ्ठी द्या असे त्याने जाहीर केले.
संगीताच्या व तिच्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने हा प्रकार योग्य नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे तिच्यासह तिच्या नातेवाईकांनी  या प्रकाराला नकार दिला. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. शेवटी आपली बाजू सावरत आपण यापुढे असे करणार नाही असे त्याने सर्वांसमोर कबुल केले. त्यानंतर सर्व जण आपल्या घरी निघून गेले व वादावर तात्पुरता का होईना पडदा पडला.
त्यानंतर काही दिवसांनी संगिता आपल्या पती व दोघा मुलांसह नोकरीच्या ठिकाणी मुलचेरा या गावी निघून गेले. दोघा पती पत्नीत वाद नको म्हणून त्यांच्या सोबत धनराजचे आई वडील देखील गेले.
मुलचेरा येथे गेल्यावर पुन्हा काही दिवसांनी ये रे माझ्या मागल्या हा प्रकार सुरु झाला. पती धनराज व त्या महिला पोलिस कर्मचा-याचे प्रेमसंबंध अव्याहतपणे सुरुच असल्याचे संगिताच्या लक्षात आले. सकाळ  झाल्यावर त्या महिला कर्मचा-यासाठी चहा व नाश्ता देण्यासाठी धनराज संगिताला फर्मान सोडू लागला. फर्मान पुर्ण केले नाही तर तो तिला मारहाण देखील करु लागला. हा प्रकार संगिताने आपल्या माहेरी सांगितला. त्यावर तिच्या आईवडीलांनी तिला विचारले की हा प्रकार तु तुझ्या सासू सास-यांना का सांगत नाही. त्यावर तिने सांगितले की ते देखील धनराजच्या बाजुने बोलतात. धनराजच्या प्रेम संबंधाबाबत नातेवाईकांना सांगून बदनामी करु नको असे तिचे सासू सासरे तिला सांगू लागले.
हा प्रकार आता संगिताला असहय झाला होता. 4 मे रोजी सकाळी साडे दहा वाजता संगीताने  तिचे मामा चंद्रकांत वाघ यांना हा प्रकार मोबाईलद्वारे कथन केला. सासरी संगिताची मानसिक कोंडी झाली होती. तिच्या बाजुने बोलणारे कुणीही नव्हते. पती, सासु – सासरे व खुद्द ती महिला पोलिस कर्मचारी देखील तिच्यावर रुबाब करत होती.
एके दिवशी त्या महिला पोलिस कर्मचा-याचे काका संगिताला भेटले. संगीताने आपल्या मनाच्या वेदना त्यांना देखील कथन केल्या. तेव्हापासून ती महिला कर्मचारी संगिताला जास्तच त्रास देवू लागली. तुला काय करायचे ते करुन घे. मी धनराज सोबत लग्न करणार आहे असे ती संगिताला बोलू लागली.
दरम्यान कोरोनाचे सुरु असलेले थैमान व लॉकडाऊनमुळे संगिताचे आईवडील गडचिरोली जिल्हयातील मुलचेरा गावी जावू शकत नव्हते.
अखेर 7 मे रोजी तो काळा दिवस उजाडला. आता जगून काही उपयोग नाही असे मनाशी म्हणत रोजच्या त्रासाला संगिता कंटाळली. वैतागून संगीताने घरातील सरकारी एके 47 या बंदूकीने स्वत:वर गोळी झाडून आपली जिवनयात्रा संपवली. भर दुपारी दिड वाजेच्या सुमारास हा थरार घडला. अंगावर शहारे आणणारी घटना बघून संगिताची मुलगी भार्गवी घाबरली.
तिने संगिताचा भाऊ अर्थात तिचा मामा गणेश यास फोन करुन सांगितले की आईने स्वत:वर एके 47 बंदुकीने गोळी झाडून जिवनयात्रा संपवली आहे. तिचा निरोप समजताच घरातील सर्व जण काहीवेळ थबकलेच. घरातील सर्व जण घाबरुन गेले. त्यांनी संगीतासह  धनराज व त्यांच्या आईवडीलांच्या फोन वर संपर्क साधला. परंतू कुणीही फोन उचलत नव्हते. अखेर गणेशने त्या महिला पोलिस कर्मचा-याला फोन केला. त्यावर तिने सांगीतले की संगीताने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अधिक चौकशी केली असता तिने सांगितले की दोघे पती पत्नी दररोज भांडण करत होते. त्यामुळे संगिताने स्वत:वर गोळी मारुन आत्महत्या केली असावी.
त्यानंतर गणेशने मुलचेरा पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरिक्षक मिलिंद पाठक यांना फोन करुन विचारणा केली. त्यावर त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्या बहिणीला चंद्रपूर येथील दवाखान्यात नेत आहोत. तुम्ही तिकडेच या. त्यानंतर दोन तासांनी मिलींद पाठक यांनी गणेश यास फोन करुन कळवले की संगीता आता मयत झालेली आहे.
लॉकडाऊन सुरु असल्यामुळे परजिल्हयात जाण्याची परवानगी घेत सर्व नातेवाईकांनी दुस-या दिवशी सकाळी चंद्रपुर येथील रुग्णालय गाठले. भाची भार्गवी हिने रडत रडत कथन केले की आई व पप्पा नेहमी आपसात वाद घालत होते. त्या वादातून आईने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
लॉकडाऊन काळात परजिल्ह्यात प्रवासाची परवानगी मिळवत संगिताचा भाऊ व आई वडील कसेबसे चंद्रपुर व मुलचेरा गावी पोहोचले. तेथे गेल्यावर गणेश याने आपल्या बहिणीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात पती धनराज बाबुलाल शिरसाठ, सासू सुशीला बाबूलाल शिरसाठ, सासरे बाबूलाल नामदेव शिरसाठ व ती प्रेयसी महिला पोलिस कर्मचारी यांच्या विरुद्ध 8 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.   सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 26/20 भा.द.वि. 306,504,34 नुसार दाखल करण्यात आला. लवकरच संशयित धनराज शिरसाठ यास अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास सुरुवातीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
संगीता शिरसाठ आत्महत्या प्रकरणी वुई फॉर चेंज या संघटनेतर्फे राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली. त्यात म्हटल्यानुसार पती धनराज हा त्याची पत्नी संगीताच्या मागे घटस्फोटासाठी तगादा लावत होता. मात्र संगीता त्याला घटस्फोट देण्यास तयार नव्हती. याच संदर्भात संगीताने मुलचेरा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे धनराज शिरसाठ आणि महिला पोलीस शिपाई यांच्या अनैतिक संबंधांची माहिती देऊन धनराज शिरसाट यांची बदली करण्यात यावी अशी विनंती केली होती. मात्र पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पत्राची दखल घेतली नाही असे समजते. सर्व उपाय केल्यानंतर निराश झालेल्या संगिताने एके 47 या रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. वुई फॉर चेंज ही महिलांसाठी लढणारी संघटना धनराज शिरसाट विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी तसेच त्याला त्वरित अटक करण्यात यावे अशी मागणी करते.
गडचिरोली जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत पोलिस अधिकारी  व महिला कर्मचारी यात सशयीताच्या पिंज-यात आहे. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारची अनेक प्रकरणे झाली आहेत. सहकारी महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी अनेक अधिका-यांनी गैरवर्तन केल्याची प्रकरणे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात जवळपास सात हजार पोलिस कर्मचारी कार्यरत असून ते जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात काम करत असतात. त्यामुळे सहाजिकच प्रशासनाची त्यांच्या कामावर फारशी पकड नसते.
गडचिरोली जिल्ह्यातील महिला पोलिस कर्मचा-यांच्या बाबतीत अनेक प्रवाद आहेत. लोक कुजबुजत अनेक गोष्टी बोलतात, पण प्रत्यक्ष तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची कुणी हिम्मत करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here