पत्नीच्या चारित्र्यामुळे संतोष त्रस्त झाला फार,निष्पाप दोघा मुलांसह त्याने केले तिला ठार

घटनास्थळाची पाहणी करतांना पोलिस अधिकारी

बीड: सोलापूर येथील संगिता सोबत संतोषचा विवाह सोळा वर्षापुर्वी झाला होता. या सोळा वर्षाच्या कालावधीत दोघांचे वैवाहीक जिवन तसे चांगले सुरु होते. मोलमजुरी करुन संतोष आपल्या परिवाराच्या संसाराचा गाडा हाकत होता. बिड शहराच्या शुक्रवार पेठ भागात संतोष कोकणे पत्नी संगिता व तिन मुलांसह रहात होता. बिड शहरातील पवनसुत ट्रेडींग कंपनीत संतोष सेल्समन म्हणून काम करत होता.

हर्ष पोद्दार (एस.पी)

संतोष रहात असलेल्या वाड्यातच त्याचा भाऊ देखील आपल्या परिवारासह रहात होता. त्याची बहिण देखील गावातच आपल्या पती व मुलांसह रहाते. एकाच वाड्यात भाऊ व गावात बहिण रहात असल्यामुळे सुख दुखा:त सर्व जण एकमेकांच्या मदतीला धावून येत होते.

दोन वर्षांपूर्वी संतोषला पॅरालीसीसचा आजार बळावला. आजारामुळे तो हतबल झाला होता. तशाही परिस्थितीत तो गोळ्या बिस्कीटे विकून संसाराचा गाडा चालवत होता. संतोषची पत्नी चार ठिकाणी जावून धुणी भांडी करण्यासाठी जात होती. त्या माध्यमातून ती परिवाराचा गाडा हाकण्यासाठी उपयोगी ठरत होती.

संतोषची पत्नी नेहमी तिच्यासोबत मोबाईल बाळगत होती. त्याची पत्नी संगीता मात्र बाहेरगावी जात होती. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य मिळाले होते.

संतोषच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे त्याची पत्नी संगिता रात्री अपरात्री कुणाशीतरी बोलत असते. तु एवढ्या रात्री एवढा वेळ कुणाशी बोलत असते याची त्याने पती या नात्याने तिला विचारणा केली. मी माझ्या आई व भावासोबत बोलते असे उत्तर देवून तिने त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या उत्तराने संतोषचे समाधान झाले नाही. त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती.

तो तिच्या फोनवरील बोलण्यावर लक्ष ठेवून रहात होता. ती कधीकधी गुपचूप व्हिडीओ कॉलवर  बोलत असल्याचे देखील संतोषच्या लक्षात येवू लागले. तिचे असे वागणे संतोषला संशयास्पद वाटत होते. विचारणा केल्यास तिचे नेहमीचे उत्तर रहात होते की मी माझ्या आई व भावासोबत बोलते. हा प्रकार गेल्या कित्येक दिवसापासून सुरु होता. कधी कधी ती संतोषला न सांगता गुपचूप घरातून निघून जात होती. या सर्व प्रकाराचा संतोषला राग येत होता. मात्र तो ब-याचदा राग गिळून टाकत होता.

कधी कधी त्याची राग सहन करण्याची परिसिमा संपून जात होती. त्यामुळे तो तिच्यावर चिड चिड करत होता.आता तो तिच्या मोबाईलवर येणा-या व्हिडीओ कॉलचा शोध घेवू लागला. त्याने तिला येणा-या फोनची विचारणा केली म्हणजे ती सरळ त्याच्यासोबत अरेरावीची भाषाच करत होती. तिच्या अरेरावीच्या शब्दांना व आपल्या इज्जतीला घाबरुन संतोष गप्प बसू लागला.   

25  मार्च रोजी ती तिचा लहान मुलगा कल्पेश यास सोबत घेवून न सांगता कुठेतरी निघून गेली. ती सरळ दुस-या दिवशी दुपारीच घरात परत आली. तु कुठे गेली होती असा प्रश्न संतोषने तिला विचारला असता तिने त्याला सांगितले की मी सोलापूर येथे माझ्या आईला भेटण्यासाठी गेली होती. तिच्या बोलण्यावर संतोषला शंका आली होती. त्याने खात्री करण्यासाठी त्याच्या सासू व सास-यांना फोन लावून विचारणा केली.

त्यात त्याला तफावत आढळून आली. सर्वच जण आपल्यासोबत खोटे बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले. एकंदरीत पत्नी संगीताच्या अशा वागण्यामुळे संतोष त्रस्त झाला. पॅरेलिसीसमुळे तो हतबल होता. तो बाहेर कामाला कुठे जावू देखील शकत नव्हता.

मयत संगिता

तरीदेखील त्याने पत्नी संगीताची माहिती संकलीत करण्यास सुरुवात केली. त्याला समजले की तिचे शहरातील एका तरुणासोबत प्रेम व शारिरीक संबंध आहेत. आपल्या पत्नीचे पर पुरुषासोबत संबंध असल्याचे लक्षात येताच तो मनाने खचला. त्याच्या मनाला वेदना झाल्या. त्याने पत्नी संगीताला समजावले.

तु असे चुकीचे काम करु नको आपल्या संसारासाठी ते योग्य नाही अशा प्रकारे त्याने तिला समजावण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र संगिता समजून व ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी त्याने जवळच्या नातेवाईकांच्या कानावर हा प्रकार टाकला. पत्नी संगीताला समजावण्याची त्याने नातेवाईकांना विनंती केली. नातेवाईकांनी देखील तिला समजावण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

16 एप्रिल रोजी देखील ती आपल्या लहान मुलाला सोबत घेवून न सांगता कुठे तरी निघून गेली. तिन दिवस वाट बघून देखील ती घरी परत आली नाही. तपास केला असता ती पर पुरुषाच्या घरी असल्याचे त्याला समजले. या बाबत त्याने पेठ बिड पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. 23 एप्रिल रोजी तिला त्या तरुणाच्या घरातून पोलिसांनी बोलावुन आणले. तिला समज देण्यात आली.

पोलिसांनी तिला समजावल्यानंतर ती पती संतोषसोबत घरी येण्यास तयार झाली. आता यापुढे आपण संतोषसोबत निट वागणार असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.काही दिवस चांगले गेले. मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे म्हणत तिने आपली जुनी वाट सोडली नाही. 21 मे रोजी ती पुन्हा घरातून निघून गेली. दुस-या दिवशी दुपारीच ती परत आली. यावेळी संतोषने तिला कुठलीही विचारणा केली नाही.

दुसऱ्या दिवशी 23 मे रोजी सकाळीच तीने बॅग भरुन आपल्या माहेरचा रस्ता धरला. ती सरळ माहेरी निघून गेली. त्यामुळे हताश झालेला संतोष गावातील आपल्या बहिणीच्या घरी गेला. त्याच दिवशी दुपारी ती त्याच्याजवळ येवून घराची चावी मागू लागली. ती परत आल्याचे बघून तो तिच्यासोबत घरी परत आला.

घरी येताच तिने त्याच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला धक्काबुक्की करु लागली. तुला आता फासावरच लटकवते अशा भाषेत ती त्याच्यासोबत बोलू लागली. बघता बघता पती पत्नीत मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमक होवू लागली. हा प्रकार बिचारी मुले निमुटपणे बघत होती.

हा प्रकार असहय झाल्यामुळे त्याने पेठ बिड पोलिस स्टेशन गाठले व हकीकत कथन केली. त्यानंतर त्याची घरी जाण्याची इच्छा नव्हती. त्याने मयुरेश नावाच्या मुलाला सोबत घेत पुन्हा बहिणीचे घर गाठले. तेथेच तो मुक्कामी राहिला.

त्याच्या मनात पत्नीचे विचार घोंगावत होते. 24 मे रोजी सकाळी चार वाजता त्याला जाग  आली. त्याने  झोपण्याचा खुप प्रयत्न केला. परंतु त्याला झोप येत नव्हती. सकाळी साडेचार वाजता बहिणीच्या घरातून तो उठला. कुणाला काही न सांगता तो घराकडे आला.

त्याने खिडकीतून घरात पाहणी केली. त्याची दोन्ही मुले व पत्नी संगिता असे सर्व जण झोपले होते. त्याने हळूच घराचा दरवाजा उघडून आत गेला.पत्नीच्या वागणुकीची त्याला प्रचंड चीड आली होती. त्याने संतापाच्या भरात घरातील मुलांची खेळण्याची बॅट हातात घेतली. त्या बॅटचा फटका त्याने जोरात संगीताच्या कपाळावर मारला.

लाकडी बॅटचा जोरात फटका बसताच ती रक्तबंबाळ झाली. नेमके काय झाले हे तिला लवकर कळलेच नाही. ती उठण्याचा प्रयत्न करु लागली. तेवढ्यात त्याने पुन्हा तिच्या डोक्यात लाकडी बॅटचे दोन वार केले. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. दरम्यान झालेल्या आक्रोशामुळे मुलगा सिद्धेश जागा झाला.  

पप्पा तुम्ही हे काय केले असे तो संतोषला विचारु लागला. आता मुलगा आरडा ओरड करणार आणि आपला कारनामा जगजाहीर होणार असे त्याच्या लक्षात आले. त्याने निष्पाप बालक सिद्धेषच्या देखील डोक्यात बॅट हाणली. बॅटच्या हल्ल्यात निष्पाप सिद्धेष घायाळ झाला व खाली पडला. तो उठू नये म्हणून त्याच्यावर संतोषने पुन्हा वार केला. दरम्यान लहान मुलगा कल्पेश हा देखील जागा झाला.

त्यामुळे संतापलेल्या संतोषने निष्पाप कल्पेशला देखील बॅटने मारले. तो लागलीच बेशुद्ध झाला. बेशुद्ध कल्पेशला संतोषने उचलून पाण्याच्या ड्र्म मधे बुडवले. धुणे धुण्याचा दगड उचलून पत्नी संगीताच्या डोक्यात हाणला. पत्नी मयत झाल्याचे लक्षात येताच त्याने तेथून पळ काढला. घराचा दरवाजा लावून सकाळीच तो बहिणीच्या घरी जावून पुन्हा झोपून गेला.

सकाळी आठ वाजता उठून चहापान आटोपून त्याने थेट पेठ बिड पोलिस स्टेशन गाठले. झाला प्रकार त्याने न सांगता मागील तक्रारीचे काय झाले अशी विचारणा करु लागला. त्यानंतर त्याने पुन्हा बहिणीच्या घराची वाट धरली.

वाटेत त्याला त्याचा भाऊ संदिप भेटला. भाऊ भेटताच त्याला रडू आले. भावाला त्याने रडत रडत सर्व पकार कथन केला. भावाने त्याला पोलिस स्टेशनला आणले. त्याने केलेल्या तिहेरी हत्याकांडाची माहिती त्याने कथन केली. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संतोषचा पत्नीवर राग होता. त्या रागातून त्याने पत्नीची हत्या केली. मात्र यात त्याच्या दोन निष्पाप मुलांची विनाकारण हत्या झाली.

त्याचा एक मुलगा त्याच्यासोबत त्याच्या बहिणीकडे मुक्कामी होता. त्यामुळे तो बचावला. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्करराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विश्वास पाटील, पो.उ.नि.बनकर, पोलिस नाईक सुनिल हलगट आदी करत आहेत.

आई व भावाचा खुन झाल्यानंतर सुन्न झालेला मयुरेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here