पायलला भोळी म्हणावी की खुळी ! झोळीतल्या बाळाची तिने केली होळी !!

child murder story

जालना : अल्पवयीन पायल दिसायला देखणी होती. बालपणातील तिचे अनोखे रुप सोळाव्या वयाकडे  वाटचाल करतांना अजुनच खुलून दिसत होते. तारुण्याकडे वाटचाल करणा-या पायलचे पाऊल  वाकडे पडू शकते याची कल्पना तिच्या पालकांना आली होती. त्यामुळे ती शक्यता गृहीत धरुन तिच्या आईवडीलांनी तिचे लग्न ती अल्पवयीन असतांनाच लावून देण्याचे ठरवले होते. तिचे कौमार्य अजून परिपक्व झाले नसतांनाच तिचे लग्न बिड जिल्हयाच्या गेवराई येथील एका तरुणासोबत लावून देण्यात आले होते. बिड जिल्हयाच्या अंबड येथील माहेरवाशीन पायल लग्नानंतर सासरी गेवराई येथे राहण्यास आली होती. लग्नानंतर काही दिवस ती सासरी राहीली. मात्र पतीला गंभीर आजार असल्याचे पायलच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. ती लवकरच आपल्या माहेरी निघून आली. आता पुन्हा सासरी परत जायचे नाही असे ठरवूनच ती माहेरी आली होती.

पायलच्या भावाचा एक मित्र होता.अशोक जाधव असे त्याचे नाव होते. भावाचा मित्र असल्यामुळे त्याचे पायलच्या कुटूंबात नेहमी येणे जाणे होते. त्यामुळे अशोक व पायलची नेहमी नजरानजर सुरु झाली होती. कधी कधी पायलचा भाऊ घरी नसतांना अशोक तेथे येत असे. त्यावेळी अशोक व पायलची नजरानजर व संभाषण हमखास होत असे. त्यातून दोघांना एकमेकांचा स्वभाव समजू लागला. दोघांचा हळूहळू संपर्क देखील वाढू लागला. संपर्कातून दोघांचा सहवास आकार घेत होता. बघता बघता दोघांचे विचार जुळू लागले व दोघे एकमेकांना लपूनछपून भेटू लागले. भेटी दरम्यान सकाळची दुपार वा दुपारची सायंकाळ केव्हा होत असे हे त्यांना समजत देखील नव्हते. अशा प्रकारे दोघांच्या प्रेमाचा सिलसिला सुरु  होता. दोघात प्रेमाचे अंकुर फुलत होते. पायल अजुन अल्पवयीन होती. ती अल्पवयीन असली तरी तिचे रुप एखाद्या नवयौवने समान होते. अशोक तिच्या रुपाचा दिवाना झाला होता. दोघांनी एकमेकांवर आपले प्रेम व्यक्त केले होते. दोघांनी लग्न देखील करण्याचे ठरवले. मात्र अडचण ही होती की पायल अजून अल्पवयीन होती. तसेच दोघे वेगवेगळ्या समाजाचे होते. आपल्या आंतरजातीय विवाहाला समाज व परिवारातून मान्यता मिळणार नाही हे दोघे समजून होते. तरीदेखील दोघांच्या प्रेमाची कुणकुण पायलच्या आईला लागली होती.

एके दिवशी पायल व अशोक यांनी लपूनछ्पून घरातून पुर्व नियोजित पळ काढला. त्यांनी गुपचूप प्रेम विवाह देखील उरकून घेतला.  आपल्या मुलीला अशोक जाधव यानेच पळवून नेल्याची खात्री पायलच्या आईला झाली होती. आपल्या मुलीला अशोक याने पळवून नेल्याबाबतची फिर्याद तिच्या आईने अंबड पोलिस स्टेशनला दाखल केली. अंबड पोलिसांनी सापळा रचून अशोक व पायल यांना लवकरच ताब्यात घेतले. अल्पवयीन पायल हिस रिमांड होम मधे रवाना करण्यात आले तर अशोक यास अटक करण्यात आली.

कालांतराने अशोकचा जामीन मंजुर झाला तर पायल देखील सज्ञान झाल्यानंतर बालसुधारगृहातून बाहेर आली. दोघांना आता रान मोकळे होते. अल्पवयीन पायल आता सज्ञान झाली होती. पुन्हा दोघांच्या भेटण्याचा व प्रेम व्यक्त करण्याचा सिलसिला सुरु झाला. दोघांनी समाजाची बंधने झुगारुन लग्न केले. दोघांचा राजा राणीचा संसार सुरु झाला. दोघांनी अंबड येथील आंबेडकर नगर भागात आपला संसार थाटला. लग्नानंतर पायलला दिवस गेले. आता लवकरच दोघात तिसरा येणार याची चाहुल दोघांना लागली होती. दोघांच्या संसार वेलीवर एका कन्यारत्नाचे आगमन झाले. सन २०१७ मध्ये पायलने एका गोंडस मुलीस जन्म दिला. अशा प्रकारे दोघांचे एकंदरीत व्यवस्थित सुरु होते.

बाळाचा मृतदेह

दोन वर्षात पुन्हा पायलल दिवस गेले. दरम्यानच्या काळात तिच्या आईचा तिच्या बद्दल असलेला विरोध ब-याच प्रमाणात मावळला होता. मात्र तिच्या सासूचे अर्थात अशोकच्या आईसोबत तिचे काही जमत नव्हते. लहान सहान कारणावरुन पायल व तिच्या सासूमधे कुरबुरी सुरुच रहात होत्या. बाळंतपणाच्या काळात महिलेसोबत वाद घालू नये तसेच वादाचे वातावरण नसावे असे म्हटले जाते. मात्र तिच्या सासूचे तिच्यासोबत सुरु असलेले वाद काही केल्या थांबत नव्हते. तुझी मुले मी हिसकावून घेईन व तुला या घरातून बाहेर काढून देईन अशी धमकी पायलला सासूकडून मिळत होती. त्यामुळे पायल नेहमी तणावात रहात होती. आम्ही तुला नांदवणार नाही असे तिची सासू तिला नेहमी म्हणत असे. त्यामुळे या ताणतणावापासून मुक्ती मिळण्यसाठी दुस-या बाळंतपणाच्या काळात ती काही दिवस तिच्या आईकडे आली. दरम्यान तिच्या सासूने तिला आपल्या घरी अर्थात सासरी आणले. त्यावेळी पायलला सातवा महिना सुरु होता. सासूच्या म्हणण्यानुसार ती सासरी आली परंतू दोघातील वाद सुरुच होते. लवकरच तिचा प्रसुतीकाळ देखील जवळ आला होता. या कालावधीत नेमकी तिची सासू बाहेरगावी निघून गेली. त्यामुळे तिच्याकडे लक्ष देण्यास कुणी नव्हते. अशा परिस्थितीत पती अशोक याने तिला शहरातील चांगुले नगर येथे आणले. तिचे दुसरे बाळंतपण पार पडले. तिला दुसरा मुलगा झाला. दुसरा मुलगा झाल्यानंतर सासूच्या वागण्यात फरक पडेल असे तिला वाटत होते. मात्र तसे काही झाले नाही. तिची सासू तिला नेहमी म्हणत होती की मी तुझी मुले हिसकावून घेईन व तुला घरातून हाकलून देईन. सासूच्या या धमकीमुळे पायल नेहमीच तणावाखाली वावरत होती.  

पायलचे बाळ आता तिन महिन्यांचे झाले होते.  अंबड शहरातील आंबेडकरनगर भागात अशोक व पायल आपल्या दोघा लहान मुलांसह रहात होते. सोबत पायलची सासू देखील रहात होती. सोबत सासू रहात असल्यामुळे व सासूकडून होत असलेला त्रास पायल सहन करत होती. तुझ्या मुलांना हिसकावून तुला हाकलून देईन हे नेहमीचे वाक्य तिला सासूकडून ऐकायला मिळत होते.

25 मे रोजी रात्री सर्व जण जेवण करुन झोपले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्व जण अंगणात झोपले होते. पायलने तिच्या तिन महिन्याच्या बाळाला रात्री एक वाजता दुध पाजून घरातील खोलीत पलंगाला बांधलेल्या झोक्यात टाकले. बाळ घरात एकटेच व सर्व सदस्य बाहेर अंगणात झोपले होते. झोपण्यापूर्वी घराच्या वाड्याचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला होता. झोळीतील बाळाला हवा लागण्यासाठी खिडकी उघडी ठेवली होती.

पायल अंगणात निजली होती. मात्र तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तिला सासूकडून नेहमी मिळणारी धमकी अस्वस्थ करत होती. आपल्याला सासूने घरातून हाकलून दिले व आपल्या मुलांना आपल्या ताब्यातून घेतले तर आपण काय करायचे हा प्रश्न तिला सतावत होता. आपल्या पश्चात आपल्या तिन महिन्यांच्या बाळाचे हाल नको असे म्हणत विचारांच्या गर्तेतून ती उठली. तिने कठोर होत आपल्या तिन महिन्याच्या बाळाला झोळीतून उचलले. अंगणात ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत मागचा पुढचा विचार न करता तिने त्या बाळाला टाकून दिले. नाका तोंडात पाणी गेल्याने बाळाने जिव सोडण्यास वेळ लागला नाही. बाळ पाण्याच्या टाकीत पडल्याने काहीतरी आवाज झाल्याचा भास अशोक यास झाला.

घटनास्थळ

काही वेळाने तो जागेवरुन उठला. त्यावेळी काही झालेच नाही अशा अविर्भावात पायल आपल्या जागेवर झोपली होती. अशोक उठला व घरात गेला असता त्याला झोळीत बाळ दिसले नाही. त्याने लागलीच पायलला उठवून बाळ कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर आपल्याला काहीच माहित नाही अशी तिने भुमिका घेतली.

सर्वत्र शोधाशोध केली असता काहीवेळाने बाळ अंगणातील पाण्याच्या टाकीत पडलेले दिसून आले. या घटनेने खळबळ माजली. आपल्या बाळाला कुणी पाण्याच्या टाकीत टाकून दिले अशी भुमिका घेत तिने रडण्यास सुरुवात केली.

या प्रकरणी पायल हिनेच अंबड पोलिसात आपल्या तिन महिन्याच्या बाळाला कुणीतरी पाण्याच्या टाकीत फेकून त्याची हत्या केली असल्याची फिर्याद दाखल केली. या घटनेची माहिती परिसरात वा-यासारखी पसरण्यास वेळ लागला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी सी. डी. शेवगन व अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नांदेडकर यांना विशेष सूचना त्यांनी तपासकामी दिल्या. पो.नि. नांदेडकर यांनी आपले सहकारी सहायक पोलिस निरिक्षक भारत बलैया यांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली.

घरात बाहेरचा कुणीही व्यक्ती आला नसतांना बाळाला पाण्याच्या टाकीत घरातीलच कुणीतरी सदस्याने टाकले असावे हे निश्चित होते. त्या दृष्टीने घरातील सर्व सदस्यांची कसुन चौकशी करण्यात आली. गुन्हेगार हा कुणीतरी जवळचाच असतो हे नविन नाही. त्या दृष्टीने तपास केला असता तपासाचा रोख पायल व तिच्या सासूवर ठेवण्यात आला. सासू व सुनेत नेहमी वाद होत असत हा मुद्दा पोलिसांच्या लक्षात आला. सासू व सुनेची कसून चौकशी केली असता माताच कुमाता असल्याचे स्पष्ट झाले.

समोर आलेल्या सत्यामुळे सर्वांची डोके चक्रावून गेली व त्यांचा विश्वस बसत नव्हता. शेवटी सत्य हे उघड होतच असते. सत्याला टोक असते त्यामुळे ते सर्वांना खुपते. गुन्हयाच्या तपासाअंती आईनेच आपल्या तीन चिमुकल्याला ठार मारले असल्याची माहीती समोर आली. माता नव्हे तू वैरिणी अशी म्हणायची वेळ आली. या चिमुकल्याची आई पायल हिचा आंतरजातीय प्रेम विवाह अशोक जाधव सोबत झाला होता. आपल्या मुलांना आपल्यापासून हिसकावून  आपल्याला घरातून बाहेर काढून देतील अशी भिती असल्यामुळे आपण तिन महिन्याच्या मुलास ठार केल्याचे पायलने पोलिसांना कथन केले.

ज्या बाळाने हे जग देखील पाहिले नव्हते त्याचा अशा प्रकारे निर्दयीपणे खून व्हावा ही संतापजनक घटना घडल्यामुळे समाजात तिव्र निषेध व्यक्त होत आहे. या बाळाने कुणाचे काय बिघडवले की त्याचा खूनच करावा लागला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून, या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. आपल्या बाळाला ठार करणा-या पायल जाधव हिस अंबड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बी. के. बलय्या हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here