जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): अल्पवयीन कंगना (काल्पनिक नाव) दिसायला देखणी होती. ती जन्माला आल्यापासून संघर्ष तिच्या नशीबी आला होता. ती दोन वर्षाची असतांनाच तिच्या वडीलांचे आजारपणात निधन झाले. त्यामुळे ती तिच्या आई व भावासह मामाच्या घरी रावेर तालुक्यात राहण्यास आली. मामा व आईने मिळून तिचे पालनपोषण केले. बघता बघता कॅलेंडरच्या तारखा बदलत गेल्या आणि कंगना मोठी होत गेली. ती मामाच्या गावी रावेर तालुक्यात शिक्षण घेत होती. ती दहावीच्या वर्गात शिकत असतांनाच गावातील एका मुलासोबत तिची नजरानजर होण्यास सुरुवात झाली. बालवयातच ती आणि तो मुलगा असे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्या वयात शिक्षण घ्यायचे असते, जीवनात मोठे होण्याची स्वप्ने बघायची असतात त्या कोवळ्या वयात दहावीची विद्यार्थीनी असलेली कंगना गावातील विशाल नाव असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. कोवळी कंगना आपल्या प्रेमात पडल्याचे बघून तिचा प्रियकर विशाल मनातल्या मनात खुष झाला.

रावेर तालुक्यातील ते छोटेशे गाव. त्या गावात एखाद्या मुलीचे एखाद्या मुलासोबत प्रेम प्रकरण सुरु झाले म्हणजे लागलीच चर्चेला उधान येते. मोठ्या शहरात असे होत नाही. मोठ्या शहरात अशी अनेक प्रेम प्रकरणे कुणाला पटकन समजत देखील नाही. मात्र हे प्रेमवीर छोट्याशा गावात रहात होते. त्यामुळे त्यांचे प्रेम प्रकरण कंगनाच्या मामाला आणि आईला समजण्यास वेळ लागला नाही. अवघी पंधरा वर्षाची आपली मुलगी कंगना हातातून सुटून जाईल हा विचार तिच्या आईला स्वस्थ बसू देत नव्हता. कंगनाच्या आईने हा प्रकार तिच्या भावाला अर्थात कंगनाच्या मामांच्या कानावर टाकला. कंगनाची आई आणी मामा या दोघा भाऊ बहिणीने कंगनाला वेळीच आवर घालण्याचा विचार सुरु केला.
बाल वयात कंगना गावातील विशाल नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडल्याचे समजल्यानंतर तिची आई अस्वस्थ झाली. तिने कंगनाला चांगलेच खडसावले. या वयात मुलींचे पाय वाकडे पडण्याची शक्यता अधिक असते हे तिची आई चांगल्याप्रकारे जाणून होती. त्यामुळे तिने आपल्या मुलीभोवती लग्नाचे कुंपन घालण्याचा विचार सुरु केला. ती अल्पवयीन आहे हे माहिती असून देखील तिच्या आईने तिला लवकरात लवकर लग्नबंधनात अडकवण्याचा विचार सुरु केला. अल्पवयीन कंगनाला पतीरुपी कुंपनात ठेवले म्हणजे ती त्यात सुरक्षीत राहील आणि आपली जबाबदारी कमी होईल असे तिच्या आईला वाटत होते. त्यादृष्टीने सक्रीय होत तिने पुढील कामकाजाला वायुवेगाने सुरुवात केली.
कंगनाचे पाऊल वाकडे पडत असल्याचे बघून तिच्या आईने तिला जळगाव येथे तिच्या विवाहीत पुतणीकडे राहण्यास आणले. जळगावला विवाहीत चुलत बहिणीकडे कंगनाला सक्तीने राहण्याची वेळ आली. आई आणि चुलत बहिणीने डोळे वटारुन पाहिल्यामुळे त्यांच्या आदेशाचे गुमान पालन करण्याशिवाय कंगनाकडे पर्याय नव्हता. ती गुपचूप जळगावला तिच्या विवाहीत चुलत बहिणीकडे राहू लागली. कंगना जळगावला राहण्यास आल्यामुळे तिची आणि तिचा प्रियकर विशाल या दोघांची ताटातुट झाली. दोघांची भेट आता दुरापास्त झाली. ती इकडे तर विशाल तिकडे अशा अवस्थेत दोघे अस्वस्थ आणि उदास राहू लागले.
कंगना अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिची आई व तिची चुलत बहिणीने तिच्यासाठी स्थळ शोधण्याची घाई सुरु केली. लवकरच त्यांनी अल्पवयीन कंगनासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील एका तरुणाचे स्थळ शोधून आणले. तिचे त्या तरुणासोबत लग्न देखील घाईगर्दीत घरीच गळ्यात फुलहार टाकून लावून देण्यात आले. लग्न झाल्यामुळे अल्पवयीन कंगना तिच्या सासरी मुक्ताईनगर तालुक्यात राहू लागली. तिचा पती तिच्यासोबत शरीरसंबंध करण्यास आतुर झाला होता. त्यामुळे तिचा नकार असला तरी देखील तो समागमासाठी तिच्यावर सक्ती करु लागला. तिचा वारंवार नकार बघून तिच्या पतीने तिला शिवीगाळ व मारहाण सुरु केली. एकंदरीत अल्पवयीन कंगना मोठ्या अडचणीत व संकटात सापडली. आई व चुलत बहिणीचे असहकार्य, पतीचा छळ, प्रियकरापासून झालेली ताटातुट अशा अनेक प्रसंगाना ती तोंड देत होती.
अवघ्या दहा ते पंधरा दिवसातच ती सासरी वैतागली. एके दिवशी ती कुणाला न सांगता संधीचा फायदा घेत एकटीच जळगावला तिच्या चुलत बहिणीकडे निघून आली. मला सासरी मुक्ताईनगर तालुक्यात जायचे नाही असे तिने तिच्या चुलत बहिणीला सांगितले. कंगना एकटीच सासर सोडून जळगावला आल्याचे समजल्यानंतर तिची आई तिची समजूत घालण्यासाठी आली. सर्वजण तिला सासरी जाण्याची गळ घालत होते. तसेच तिच्या चुलत बहिणीचा दीर तिला सासरी जाण्यासाठी तिला मारहाण करत होता. एकंदरीत कंगना मोठ्या कोंडीत सापडली होती. माहेरी रावेर तालुक्यात अथवा सासरी मुक्ताईनगर तालुक्यात तिची जाण्याची तयारी नव्हती. अशा परिस्थितीत तिने गुपचूप तिच्या प्रियकराला फोन लावून जळगावला तिच्या चुलत बहिणीच्या घरी बोलावून घेतले.

तिने फोनवर निरोप दिल्याप्रमाणे तिचा प्रियकर विशाल तिच्या भेटीसाठी जळगावला आला. कंगनाला मी घेऊन जाण्यास तयार असल्याचे त्याने सर्वांना सांगितले. त्यावर तिच्या चुलत बहिणीच्या पतीने त्याला म्हटले की आम्ही हिच्या लग्नात 65 हजार रुपये खर्च केले आहेत. ते पैसे आम्हाला दे आणि कंगनाला घेऊन जायचे असल्यास घेऊन जा. माझ्याकडे एवढे पैसे आता नाही असे विशालने सांगितले. तिच्या प्रियकराने मी थोडे थोडे जसे जमतील तसे तुमचे 65 हजार देईन मात्र कंगनाला माझ्यासोबत पाठवा अशी त्याने विनंती केली. त्यावर कंगनाच्या चुलत बहिणीचा पती तयार झाला. त्याने विशालसोबत कंगनाला जाऊ देण्यास संमती दिली. त्यामुळे कंगना आणि तिचा प्रियकर असे दोघे सोबत घराबाहेर पडले.

आता कुठे जायचे असा विचार करत दोघे प्रेमी सोबत निघाले होते. कंगनाच्या ओळखीच्या व तिच्या गावाकडच्या एका महिलेच्या माहेरी दोघे आले. दोघांनी आपल्यावर बितलेली दर्दभरी कथा त्या महिलेला कथन केली. दोघांची व्यथा ऐकून त्या महिलेने ती रहात असलेल्या भाडोत्री घरात दोघांना आश्रय दिला. मात्र ते घर खुपच लहान होते. त्यामुळे सर्वजण एकाच खोलीत रहात होते. त्यामुळे कंगना आणि विशाल या दोघांना समागम करण्याची संधी मिळत नव्हती. त्या खोलीत दोघांनी कसेबसे पंधरा दिवस काढले. त्यानंतर काही दिवसांनी दोघांनी दुस-या गावात दोन खोल्यांचे नवीन घर शोधून त्याठिकाणी भाड्याने राहण्यास सुरुवात केली. या खोलीचे घरमालक एका खोलीत तर दुस-या खोलीत विशाल आणि कंगना असे राहू लागले. दिवसा विशाल चटई कंपनीत कामाला जात होता आणि सायंकाळी घरी परत येत होता. या घरात कंगना आणि विशाल यांना शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळाली. या खोलीत दोघांचे जवळपास तीन ते चार वेळा शरीरसंबंध प्रस्थापित झाले.
कंगना पतीला सोडून आल्यामुळे तिचा पती तिच्यावर मोठ्या प्रमाणात रागावला होता. मी तुला आणि तुझा प्रियकर अशा दोघांना अद्दल घडवणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कंगना जळगाव येथे महिला सहायता कक्षात मदतीसाठी आणी पतीपासून विभक्त राहण्याची मागणी करण्यासाठी आली. मात्र चौकशीअंती पिडीत कंगना ही अल्पवयीन असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे तिच्या आईला रावेर तालुक्यातून बोलावण्यात आले. पिडीत अल्पवयीन कंगना आणि तिच्या आईला निंभोरा पोलिस स्टेशनला आणण्यात आले. त्याठिकाणी पिडीत अल्पवयीन कंगनाच्या दुर्दैवी कथेच्या आधारे फिर्याद नोंदवण्यात आली. त्यामुळे या फिर्यादीच्या आधारे तिचे तिच्या संमतीविना लग्न लावून देणारी तीची आई, तिची विवाहीत चुलत बहिण, तिचा पती, तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापीत करणारा तीचा प्रियकर, तिला आश्रय देणारे घरमालक, तिला घरातून निघून जाण्यास सांगणारा तिच्या बहिणीचा दिर अशा एकुण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिला छ्ळणारे आणि तिला मदत करणारे असे सर्वच जण अडचणीत आले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. निंभोरा पोलिस स्टेशनला गु.र.न. 157/2025 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 64(2), 64(2) (i), 64(2)(एम) सह पोस्को अॅक्ट 2012 चे कलम 4, 6 सह बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9, 10, 11 प्रमाणे शुन्य क्रमांकाने हा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा जळगाव येथे शनीपेठ पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला. शनीपेठ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साजीद मंसुरी यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु केला. गु.र.न. 203/25 या क्रमांकाने दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक साजिद मंसुरी करत आहेत.








