जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : महाविद्यालय म्हटले म्हणजे त्या ठिकाणी मित्र मैत्रीणींचा समुह अर्थात फ्रेंड्स गृप असतो. या गृपच्या माध्यमातून काही मुला मुलींचे एकमेकांवर प्रेम जडते. काहींचे एकमेकांवर प्रेम नसले तरी एकमेकांसोबत विचारांची देवाणघेवाण मात्र नक्कीच होते. अभ्यास, विरंगुळा आणी विचारांची आदान प्रदान अशा स्वरुपाच्या आल्हाददायी वातावरणात विद्यार्थी – विद्यार्थिनींचा महाविद्यालयीन प्रवास सुरु असतो. मात्र अशा वेळी मत्सर आणि गैरसमज हे प्रकार देखील विद्यार्थी परत्वे होत असतात. त्यातून दुर्दैवाने गुन्हेगारीचे प्रकार देखील घडतात. आपण प्रेम करत असलेल्या तरुणीसोबत दुसरा विद्यार्थी बोलतांना दिसला म्हणजे त्या प्रेमी तरुणाच्या मनाचा जळफळाट होत असतो. त्यातून एखादा गुन्हेगारीचा प्रकार घडतो. कधी कधी एकाच तरुणीवर दोन विद्यार्थी प्रेम करतात. त्या तरुणीवर आपल्या प्रेमाची छाप दाखवण्यासाठी दोघे तरुण कसोशीने प्रयत्न करतात. त्या शर्यतीतून देखील एखादा गुन्ह्याचा प्रकार घडतो. आपण प्रेम करत असलेल्या तरुणीवर दुस-या विद्यार्थी तरुणाचे प्रेम असल्याच्या गैरसमजातून एकाने दुस-याची भर बाजारात हत्या केल्याची घटना जळगाव शहरात नववर्षाच्या शेवटच्या दिवशी घडली. या हत्याकांडात एकाचा जीव गेला तर दुसरा जेलमधे गेला.

जय गणेश गोराडे हा अवघा अठरा वर्ष वयाचा तरुण जळगाव शहरातील देवकर महाविद्यालयात अभियांत्रीकीचे शिक्षण घेत होता. अवघ्या अठरा वर्षाच्या जय यास अर्थातच साधी मिसरुढ देखील फुटलेली नव्हती. तो शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयात त्याचे फ्रेंड सर्कल तयार झाले होते. त्या फ्रेंड सर्कल मधे एक तरुणी होती. ती तरुणी आणी जय एकाच वर्गात शिकत होते. एकाच महाविद्यालयात आणि एकाच वर्गात शिकणा-या जय गोराडे याचे त्या तरुणीसोबत चांगले ट्युनींग़ जमले होते. दोघांच्या विचारांची वेव्ह लेंथ चांगली जुळल्याने दोघे एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे गप्पा करत होते. शैक्षणिक विषयासह इतर प्रासंगिक विषयावर दोघे एकमेकांसोबत विचारांची आदान प्रदान आणि मत प्रदर्शन करत होते. अशा प्रकारे दोघांचा एकमेकांसोबत सहवास वाढत होता.
जय सोबत नेहमी वावरणा-या त्या तरुणीच्या घराजवळ एक तरुण रहात होता. शुभम सोनवणे असे त्या तरुणाचे नाव होते. त्या तरुणीच्या घराजवळच शुभम सोनवणे रहात असल्यामुळे ती नेहमी त्याच्या नजरेस पडत होती. त्यातून त्याचे तिच्यावर प्रेम जडले होते. ती आपली व्हावी असे शुभम यास नेहमीच वाटत होते. कुणी तिच्यासोबत बोललेले शुभमला खपत नव्हते. त्यामुळे शुभम तिच्यावर नेहमी पाळत ठेवत असे. ती महाविद्यालयात जातांना तो तिचा पाठलाग करत असे. ती कुणासोबत बोलते याच्यावर त्याचे लक्ष रहात होते. त्या पाळतीतून तिच्यासोबत जय गोराडे हा तरुण नेहमी बोलत असल्याचे त्याच्या नजरेस पडले होते.

जिच्यावर आपण प्रेम करतो ती तरुणी जय गोराडे याची होऊ नये असे शुभमला वाटत होते. त्यामुळे त्याला जय गोराडे याचा राग येत होता. जय गोराडे याच्या जागी शुभम स्वत:ला बघत होता. तिने जयला स्पर्श केला म्हणजे तिने आपल्यालाच स्पर्श केला असा शुभमला भास होत असे. मात्र भानावर आला म्हणजे शुभम स्वत:वरच चिडत असे. त्यानंतर त्याला जय गोराडे याचा राग येत असे. तिने जय गोराडे याची संगत सोडून आपल्यासोबतच रहावे असे शुभम यास नेहमी वाटत होते. मात्र जय आणी तिची महाविद्यालयीन मैत्री होती. दोघे एकाच महाविद्यालयात, एकाच वर्गात शिकत असल्यामुळे दोघांची मैत्री जमली होती. दोघांचे विचार जुळल्यामुळे दोघे एकेमेकांची साथ सोडण्यास तयार नव्हते. त्याचाच शुभमला राग येत होता.
ती तरुणी आपल्या हातून सुटून केवळ जय याची होईल अशी भिती शुभम यास वाटत होती. जय आणी तिचे एकमेकांवर प्रेम असल्याचा संशय शुभम यास येऊ लागला. त्या गैर समजातून एके दिवशी शुभमने जय यास गाठले. तु तिचा नाद सोड, मी तिच्यावर प्रेम करतो. तु जर तिच्यासोबत दिसला तर मी तुला ठार करेन अशी उघड उघड धमकीच शुभमने जय यास दिली. शुभमच्या धमकीने जयच्या जिवाची गाळण झाली होती. अवघा अठरा वर्षाचा साधी मिसरुढ देखील न फुटलेला जय गोराडे हा तरुण मनातून पार घाबरला. त्याने त्याच्या मनातील भिती वडीलांऐवजी काका दिपक गोराडे यांच्या कानावर टाकली.

मनातून दुखी: झालेल्या जय याने एके दिवशी त्याच्या काकांची भेट घेतली. त्याच्या चेहऱ्यावर बेचैनी स्पष्ट दिसत होती. काका…… शुभम सोनवणे नावाचा तरुण मला त्रास देतो. तो मला शिवीगाळ करतो, चाकू हल्ला करण्याच्या धमक्या देतो अशी तक्रार जय याने त्याच्या काकांजवळ कथन केली. आपल्या पुतण्याच्या मनातील भय काका दिपक गोराडे यांनी ओळखले. त्यांनी जय यास धीर देत शांत केले आणी त्याचे कारण विचारले. मी शिकत असलेल्या महाविद्यालयात एक तरुणी आहे. ती तरुणी माझ्याच वर्गात शिकत असून आम्ही दोघे सोबत असतो. तिच्या घराजवळ शुभम सोनवणे राहतो. त्या तरुणीचे व माझे प्रेमप्रकरण सुरु आहे असा शुभमचा गैरसमज असल्याचे जय याने त्याच्या काकांजवळ कथन केले. त्या गैरसमजातून शुभम मला नेहमी शिवीगाळ व जीवे ठार करण्याची धमकी देत असल्याचा खुलासा जय याने काकांजवळ केला.
त्यावेळी काकांनी जय यास त्याच्या मोबाईलद्वारे शुभम यास कॉल लावण्यास सांगितले. शुभम यास कॉल लागल्यानंतर जय याने त्याचे काकांसोबत बोलणे करुन दिले. काका दिपक गोराडे यांनी शुभम सोनवणे यास प्रेमाने समजावून सांगितले की जय आणी त्या तरुणीचे प्रेम संबंध नाही. दोघे एकाच महाविद्यालयात आणी वर्गात शिकत असल्यामुळे दोघे एकमेकांसोबत बोलतात. त्यामुळे त्यांच्यात तसा कसलाही प्रकार नाही. मात्र जयच्या काकांनी समजावल्यानंतर देखील शुभमच्या मनाचे समाधान झाले नाही. त्याच्या मनात जय विषयी आकस होताच. 31 डिसेंबर 2025 हा सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस जयच्या जीवनातील अखेरचा दिवस ठरला.

जय याचे काका 31 डिसेंबर रोजी काही कामानिमीत्त एम. जे. महाविद्यालयात गेले होते. त्यावेळी जय हा शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आला होता. त्याचवेळी त्याठिकाणी शुभम सोनवणे हा देखील आलेला होता. जय समोर दिसताच शुभम सोनवणे याने त्याला चाकू दाखवला. जय याने घाबरुन त्याच्या काकांना फोन लावला. काका…… शुभम सोनवणे हा मला गोलाणी मार्केट परिसरात भेटून त्या तरुणीसोबत प्रेम प्रकरण बंद केले नाही तर मारुन टाकण्याची धमकी देत असल्याचे जय याने त्याच्या काकांना मोबाईलवर सांगितले. त्यावेळी पलीकडून काकांनी त्याला वाद न घालता गुपचूप घरी निघून जाण्यास सांगितले.
काही वेळाने पुन्हा जय याने त्याच्या काकांना फोन लावून सांगितले की शुभमने मला अडवले असून तो मला शिवीगाळ करत आहे. शुभमच्या हातात चाकू असल्याचे जय त्याच्या काकांना काकुळतीने सांगत असतांना पलीकडे त्यांना आरडाओरड सुरु असल्याचा आवाज येऊ लागला आणी काही वेळाने कॉल कट झाला. जयच्या काकांना आलेला जयचा तो कॉल शेवटचा ठरला. काकांनी पुतण्या जय यास पुन्हा कॉल केला असता तो त्याने उचलला नाही. त्यामुळे घालमेल झालेल्या अवस्थेत त्याच्या काकांनी एका मित्राच्या सोबतीने गोलाणी मार्केटच्या दिशेने भरधाव वेगात मोटार सायकलने मार्गक्रमण केले.

दरम्यानच्या कालावधीत जय आणी शुभम यांच्यात भर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झटापट सुरु होती. त्याच वेळी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या निमित्ताने मनपा आवारात धामधुम सुरु होती. त्याचवेळी मनपाच्या मागील बाजूस रस्त्यावर रक्तरंजीत थरार देखील सुरु होता. त्यामुळे गोंधळात एकच भर पडली.
दरम्यान जय आणी शुभमच्या वादाने सर्वोच्च पातळी गाठली होती. शुभमने सिने स्टाईल पाठलाग करत जय यास गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. जयच्या छातीवर उजव्या बाजुला आणि डाव्या बाजूच्या बरगडीजवळ प्राणघातक हल्ला झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला होता. नेमक्या त्याचवेळी काही कामानिमीत्त एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी रमेश चौधरी हे घटनास्थळ परिसरात आले होते. सुरु असलेला रक्तरंजीत थरार बघून अजीबात वेळ न दवडता ते जखमी जयच्या मदतीला धावून गेले. त्यांनी हल्लेखोर शुभमला घट्ट पकडून ठेवले. शिताफीने त्यांनी हल्लेखोर शुभमच्या हातातील धारदार शस्त्र सोडवून घेतले. या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने घटनास्थळ गाठले. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी रमेश चौधरी यांनी प्रसंगावधान राखत पकडून ठेवलेल्या हल्लेखोर शुभम सोनवणे यास शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान भरधाव वेगात मित्रासोबत आलेल्या जयच्या काकांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी त्यांना घटनास्थळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली. त्यावेळी त्यांना त्यांच्या ओळखीचे पोलिस कर्मचारी रमेश चौधरी दिसले. त्यांनी रमेश चौधरी यांना एवढी गर्दी कसली आहे अशी विचारणा केली. त्यावर रमेश चौधरी यांनी त्यांना सर्व घटनाक्रम कथन केला.
जखमी जय गोराडे यास रिक्षाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अधिकच बिकट असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी आयकॉन हॉस्पीटलमधे वर्ग करण्यात आले. अति रक्तस्त्रावामुळे उपचार सुरु असतांना जय गोराडे याचा मृत्यु झाला. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
मयत जय गोराडे याचे काका दिपक सोनु गोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला संशयीत आरोपी शुभम सोनवणे याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. 422/2025 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 103 (1), 127 (1), 352, 351 (2) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु करण्यात आला.
आजच्या तरुणांनी हे लक्षात ठेवायला हव की प्रेमात स्वामित्व नसतं तर विश्वास असतो. गैरसमज हा नेहमीच नात्यांचा मारेकरी ठरतो. संवाद करा, समजून घ्या, थांबा, आणि विचार करा. कारण एका चुकीच्या क्षणी घेतलेला निर्णय आयुष्यभराची शिक्षा ठरु शकतो. गैरसमजातून जन्मलेला राग, एक क्षणात एखाद्याचा जीव घेतो पण संवादातून जन्मलेला समजूतदारपणा आयुष्य वाचवतो.

जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी रमेश चौधरी हे काही कामानिमीत्त गोलाणी मार्केट परिसरात आले होते. नेमके त्याच वेळी त्यांना संशयित शुभम सोनवणे हा तरुण जय गोराडे याच्यावर प्राणघातक हल्ला करत असतांना दिसून आला. रक्ताच्या थारोळ्यातील जयचे प्राण वाचवणे गरजेचे होते. क्षणाचाही विलंब न करता रमेश चौधरी यांनी तत्परता दाखवत हल्लेखोर शुभम सोनवणे यास घट्ट पकडून ठेवले आणी शिताफीने त्याच्या हातातील धारदार शस्त्र काढून घेण्यात यश मिळवले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.







