मुंबई : लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारी करण्याची सुचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. असे असले तरी राज्यातील विरोधी पक्ष भाजपने लॉकडाऊनला विरोध केला आहे. सत्तेतील राष्ट्रवादी पक्षाने देखील लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नसल्याचे म्हणत विरोधाची भुमिका घेतली आहे.
रा.कॉ. पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी लॉकडाऊन हा त्यावरील अंतिम उपाय नसल्याचे म्हणत लॉकडाऊनला मुख्यमंत्र्यांकडे विरोध करणार असल्याचे नवाब मलीक यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन राज्यासह जनतेला परवडणारा नाही. त्यामुळे सुविधा वाढवण्यावर भर दिला जाण्याची रा.कॉ.ची भुमिका असल्याचे मलीक यांनी म्हटले आहे. मंत्रालयासह शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील भेट देणा-यांना बंदी घालून खासगी कार्यालये आणि आस्थापनांना 50% संख्येचे निर्बंध घालण्याची सुचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 50% कर्मचारी संख्येची मर्यादा कुणी पाळत नसेल तर लॉकडाऊनची तयारी करण्याची स्पष्ट सुचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.








