जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : दिनांक 18 जून 2026 ची ती मध्यरात्र. यावल तालुक्यात गावाबाहेर शेतात मित्रांची पार्टी रंगली होती. वातावरणात गप्पा, हशा आणि मद्याच्या बाटल्यांचा खणखणाट घुमत होता. काही तासांपूर्वी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून आनंद साजरा करणारे मित्र, काही क्षणांत आपले शत्रू बनतील याची पवन सोळुंके या तरुणाला कल्पना आली नव्हती.

पण दारूच्या नशेने विवेक हरपला… शब्दांची ठिणगी पडली… वादाचे रुपांतर पवन सोळुंके या तरुणाला हाणामारीत झाले. परिणामी काही वेळाने पवन सोळुंके या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याहूनही धक्कादायक म्हणजे पवन सोळुंके याच्या मृत्युनंतर घाबरलेल्या तिघा हल्लेखोर तरुणांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी संपूर्ण घटनाच रस्ता अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळावर बारकाईने केलेली पाहणी, फॉरेन्सिक तपास आणि पोलिसांच्या चिकाटीमुळे अखेर सत्य बाहेर आले. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील ही केवळ एका खूनाची कथा नाही तर दारूच्या नशेत मनुष्य किती अमानुष होऊ शकतो आणि क्षणिक राग किती कुटुंबे उद्ध्वस्त करू शकतो याचे भयावह वास्तव आहे.
यावल तालुक्यातील कोळन्हावी गावात पवन रवींद्र सोळुंके हा 26 वर्षांचा तरुण रहात होता. दिनांक 17 जून 2026 ची रात्र. प्राप्त माहितीनुसार गावाबाहेर एका शेतात मद्यपान पार्टीचे नियोजन झाले होते. त्या पार्टीचा खर्च कुंदन सोळुंके करणार होता असे म्हटले जाते. कुंदन सोळुंके याने त्याच्या दुचाकीवर पवनला बसवून पार्टीच्या ठिकाणी आणले.
त्या ठिकाणी आधीच तीन मित्र उपस्थित होते — उमेश दिलीप परदेशी, चेतन मोतीराम कोळी, लोकेश दिवाकर महाजन. पार्टी सुरू झाली. मात्र सुरुवातीपासूनच पार्टीच्या वातावरणात एक अदृश्य तणाव होता. कारण… त्या तिघांच्या मते पवन हा त्या पार्टीसाठी आमंत्रित नव्हता. त्यांच्या दृष्टीने तो अनाहूत पाहुणा होता. इतकेच नव्हे तर…”हा नेहमी पार्टीला येतो, पण पैसे खर्च करत नाही.” हा विचार देखील त्यांच्या मनात खोलवर रुजला होता. त्या रागाची ठिणगी त्या रात्री पेट घेणार होती.
पार्टी काही वेळ सुरु राहिली. यानंतर काही वेळातच कुंदन सोळुंके काही कारणाने तेथून एकटाच निघून गेला. त्याने पवनला तिथेच सोडले. आता पवनसमोर होते फक्त तीन मित्र—उमेश, चेतन आणि लोकेश. पार्टी संपल्यानंतर उमेश, चेतन आणि लोकेश या तिघांनी किनगाव येथे एका हॉटेलमधे पुन्हा मद्यपानाला जाण्याचे नियोजन केले. त्या तिघांसोबत पवन हा देखील अनाहुतपणे आला. या तिघांना पवनची उपस्थिती नको होती. मात्र तो त्यांच्यासमवेत आला होता. त्यामुळे तिघांनी त्याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तु कुंदन सोबत जसा आला तसा परत का गेला नाही अशी तिघांनी पवन सोळुंके याला विचारणा केली. त्यातून वादाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली. तिघांची मद्याची नशा वाढत होती. शब्दांनी वादाला सुरुवात झाली. जुन्या कुरबुरी बाहेर पडू लागल्या.
“तुला कोणी बोलावलं होतं?” “तुझ्यामुळे पार्टीचा मूड खराब होतो.” अशा पवन विरुद्ध आरोप-प्रत्यारोपातून वाद पेटला. रागाचे रूपांतर मारहाणीत होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला ढकलाढकली झाली. मात्र काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. उमेश, चेतन आणि लोकेश यांनी पवनला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. कोणाचाही त्याला जीवे ठार मारण्याचा हेतू नव्हता. परंतु…नशा…राग…आणि क्षणिक आवेश…या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या.
मारहाण इतकी गंभीर झाली की पवन जागीच कोसळला. थोड्याच वेळात त्याची हालचाल बंद झाली. तेव्हा तिघांच्या लक्षात आले…घटना त्यांच्या हाताबाहेर गेली होती. आता काय? असा प्रश्न तिघांसमोर उभा होता. समोर मृतदेह पडला होता. क्षणभर तिघेही गोंधळले. पोलीस? गाव? कुटुंब? समाज? या सगळ्यांची भीती त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. आता एकच मार्ग दिसत होता— सत्य लपवणे.
तिघांनी पवनची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सांडलेल्या रक्तावर माती टाकण्यात आली. त्यानंतर तिघांचा प्लॅन बी देखील तयार होता. प्लॅन बी साठी पाटचारीच्या पुढे पवनच्या मृतदेहाला पुलावर नेण्यात आला. त्याचा मृतदेह पाटचारीत फेकण्यात आला. तेथे त्याचे रक्त सांडून पुरावा तयार करण्यात आला. जर अपघाताचा बनाव उघडकीस आला तर मयत पवन हा मद्याच्या नशेत पाटचारीवरुन पाटात कोसळला असा प्लॅन बी चा देखावा तयार करण्यात आला. त्या दिशेने त्यांनी पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली. घटनास्थळी पाहणाऱ्यांनाही सुरुवातीला तो साधाच रस्ता अपघात वाटला. यावल पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला. पण यावल पोलिसांना काहीतरी खटकले घटनास्थळी पोहोचलेल्या तपास अधिकाऱ्यांनी पाहणी केली. साधारण अपघातात दिसणाऱ्या अनेक गोष्टी येथे नव्हत्या.
वाहनाचे कोणतेही स्पष्ट चिन्ह नव्हते. घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद होती. जखमांचे स्वरूप अपघाताशी पूर्णपणे जुळत नव्हते. मृतदेह ज्या अवस्थेत होता त्यातून वेगळाच संशय निर्माण होत होता. पोलिसांच्या अनुभवी नजरेला हा प्रकार सहजासहजी पटला नाही. त्यामुळे अपघाताऐवजी हत्येचा अॅंगल तपासात पुढे आला.
तपास अधिक खोलवर नेण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले. पुरावे गोळा करण्यात आले. मृताच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. मोबाईल, स्थानिक माहिती, गावातील चौकशी, मित्रपरिवार यांची पडताळणी सुरू झाली. तपास अधिकाधिक संकुचित होत गेला. शेवटी पोलिसांची नजर त्या तिघांवर स्थिरावली.
उमेश, चेतन आणि लोकेश यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका होती. प्रत्येकाचे उत्तर वेगळे. पण… अनुभवी चौकशीसमोर त्यांचे कथन विसंगत ठरू लागले. पुरावे एकमेकांशी जुळू लागले. शेवटी सत्य बाहेर आले. पार्टी… वाद… मारहाण…मृत्यू…आणि त्यानंतर अपघाताचा बनाव.या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे आणखी काही धागेदोरे मिळू लागले. मृत पवनला पार्टीत आणणारा कुंदन सोळुंके याचीही चौकशी करण्यात आली. तपासातील माहितीच्या आधारे त्यालाही पुढील कारवाईसाठी अटक करण्यात आली आणि न्यायालयीन प्रक्रियेनुसार पोलिस कोठडी मिळवण्यात आली.
एका क्षणाच्या रागाने…एका दारूच्या पार्टीने…एका चुकीच्या निर्णयाने…एका तरुणाचा जीव गेला. आणि उरलेले तरुण तुरुंगात पोहोचले. एका कुटुंबाने मुलगा गमावला. तर इतर कुटुंबांनी स्वतःची मुले संशयित आरोपी म्हणून पाहिली.
दारू स्वतः गुन्हा घडवत नाही. परंतु ती विवेक हरपवू शकते. क्षणिक राग, अहंकार, अपमानाची भावना आणि नशा यांचे मिश्रण अनेकदा अपरिवर्तनीय परिणाम घडवते. ही घटना काही महत्त्वाचे धडे देते— मित्रत्व म्हणजे एकमेकांचा आदर; अपमान नव्हे. कोणताही वाद हिंसेने कधीच सुटत नाही. अपघाताचा बनाव करून सत्य कायमचे लपवता येत नाही. आधुनिक फॉरेन्सिक तपास, वैज्ञानिक पुरावे आणि सातत्यपूर्ण पोलिस तपास यामुळे सत्य शेवटी समोर येते. क्षणिक आवेशात घेतलेला निर्णय अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. एका रात्रीच्या नशेने एक जीव गेला आणि अनेक आयुष्ये कायमची बदलून गेली. म्हणूनच रागावर नियंत्रण, जबाबदार वर्तन आणि हिंसेपासून दूर राहणे हा प्रत्येक तरुणाचा खरा सामर्थ्याचा मार्ग आहे.






